चिंचोलीत भटके कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहीम; ३७ कुत्र्यांची धरपकड, निर्बीजीकरण करुन सोडणार
राहुरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोलीत पिसाळलेल्या नि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गत महिनाभरापासून ऐरणीवर आला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू तर अनेकांना गंभीर जखमी केले. पाळीव पशुधन व कुत्र्यांनाही लक्ष्य केल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. भटके कुत्रेही लहान मुलांवर हल्ले करत असल्याने सरपंच शोभाताई लाटे यांनी आज शोधमोहीम राबवत कुत्रे पकडण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याने परिसरातील दहशत कमी होण्यास मदत झाली.
गेल्या महिनाभरापासून चिंचोली तसेच परिसरात पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत माजवली होती. या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू तर अनेकांना गंभीर जखमी केले होते. त्यात वृध्द व लहान मुलांचा समावेश होता. घरासमोर खेळत असताना अचानक हल्ला केल्याने जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती तर रात्री-अपरात्री अंगणातील जनावरे व पाळीव कुत्र्यांना हे कुत्रे लक्ष्य करत असल्याने नेमके लसीकरण करायचे कुणाला हा प्रश्न पशुपालकांसह पशुवैद्यकांना पडला होता. नागरिकांना घराबाहेर पडणे यामुळे मुश्किल झाले होते. त्यातच अन्य शहरातून कुत्रे रात्रीच्या वेळेला परिसरात सोडण्यात येत असल्याने या कुत्र्यांची वाढती संख्या डोकेदुखी बनली होती.
संदर्भात सरपंच शोभाताई लाटे व विखे पा. कारखान्याचे संचालक बाळासाहेब लाटे यांनी उपाययोजना करत कुत्रे पकडण्यासाठी आज शुक्रवारी विशेष मोहीम राबविली. त्यात जवळपास ३७ कुत्रे पकडण्यात यश आले असल्याचे ग्रामसेवक बडाख यांनी सांगितले असून सदर कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.








