शनिवारी कडा येथे शेतकरी साहित्य संमेलन,
ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
आष्टी ( दिगंबर बोडखे ) :- आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी जिल्हा बीड द्वारा आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा येथे १ दिवशीय बीड जिल्हास्तरीय शेतकरी लेखक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आष्टी पाटोदा बीड चे माजी आ. ॲड. भीमराव धोंडे यांनी दिली.
शनिवारी सकाळी ९ वाजता या साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी १० वाजता प्रा. अनंत हंबर्डे यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तर सकाळी १०:३० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बीड जिल्हास्तरीय १ दिवसीय शेतकरी लेखक साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा साहित्यिक प्रा. डॉ. सतीश साळुंखे हे भूषविणार आहेत.
या उद्घाटन समारंभास आष्टी, पाटोदा, शिरूरचे आमदार तथा माजी मंत्री सुरेश धस, राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, माजी राज्यमंत्री तथा माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंके, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य धनंजय मुंडे, गेवराई आमदार विजयसिंह पंडित, भारतीय नद्या जोडणी प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. एम. डी. पाटील, बीडचे आमदार संदीप क्षिरसागर, साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, केजचे आमदार नमिता मुंदडा, राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य श्रीधर नांदेडकर, महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. अजयदादा धोंडे मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य तथा प्रसिद्ध कथाकार प्रा. भास्कर बडे आनंद चॅरिटेबल संस्थेचे संचालक डॉ. अभय राजे धोंडे आदी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे शानदार उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनानंतर सकाळी १२ वाजता भारतीय नद्या जोडणी प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. एम डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली (शेतकरी साहित्य – वाड्मयीन आव्हाने) या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादात प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाढ (परळी वैजनाथ) प्रा. डॉ. अनिल गर्जे (कडा), प्रा. डॉ. दिलीप भिसे (अंबाजोगाई) हे सहभागी होणार आहेत डॉ. एस डी ओव्हाळ हे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत तर प्रा. डॉ. आर. जी. बोडखे हे या परिसंवादाचे अभ्रक प्रदर्शन करणार आहे.
परिसंवादानंतर पत्रकार डॉ. विनोद ढोबळे हे लेखक, प्रा. भास्कर बडे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी १ वा. प्राचार्य डॉ . सदाशिव सरकटे (पाटोदा) यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्त्रियांचे साहित्य, आजचे वास्तव’ या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादात प्राध्यापक डॉ. मनोहर शिरसाठ (बीड) प्रा. डॉ. अशोक घोळवे (शिरूर कासार), प्रा. डॉ. रमेश रिंगणे (गढी), श्रीमती नजमा शेख (आष्टी) हे सहभागी होणार आहेत डॉ. डी. व्ही. नरसाळे हे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर डॉ. जी एस जगताप हे आभार प्रदर्शन करणार आहेत.
दुपारी २ वा. प्रकाश भुते (गेवराई) यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून, त्यामध्ये विठ्ठल जाधव (शिरूर कासार) वि.भा.साळुंखे (कडा), उमेश मोहिते (माजलगाव), ल. की. दिवटे (आष्टी), संगीता आवटे (कडा) हे कथाकथन करणार आहेत. डॉ. एस. डी. गायकवाड हे या कथाकथन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर प्रा. डॉ. एम.जी राजपांगे हे आभार प्रदर्शन करणार आहेत.
त्यानंतर ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यामध्ये बाबाजी शैक्षणिक संकुल कडा चे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभाग घेणार असून प्रा. डॉ. आर. जी. विधाते हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर प्रा. डॉ. बी एन गावडे हे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करणार आहेत.
दुपारी ४ वा. अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनात प्रा. सय्यद अल्लाउद्दीन (आष्टी), प्रभाकर साळेगावकर, मुकुंद राजपंखे, सूर्यकांत डोळसे, दादासाहेब सादोळकर, बाळासाहेब गरकळ, दिनकर जोशी, अरुण पवार, सत्यप्रेम लगड, हरीश हातवटे, इंद्रकुमार झांजे, प्रा. अभय शिंदे, डॉ. रेखा घोलप, विश्वंभर वराट, बाळासाहेब नागरगोजे, राजश्री मस्के, युवराज वायभासे, सुरेखा खेडकर, माया दिवान, गोरख शेंद्रे, सीमा गुंड, राजेंद्र लाड, संदीप पाचरणे, जगन्नाथ कांबळे, नवनाथ पोकळे, द. ल. वारे, संजय शेळके, सय्यद वसीयुद्दीन आदी कवी सहभागी होणार आहेत. कवी नागेश शेलार हे या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर प्रा. बी.ए. रणदिवे हे या कवी संमेलनाचे आभार प्रदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. सतीश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून स्वागताध्यक्ष ॲड.भीमराव धोंडे, आनंद चॅरिटेबल संस्था आष्टीच्या अध्यक्ष सौ. दमयंती भीमराव धोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. अजय दादा धोंडे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीधर नांदेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचा समारोप समारंभ होणार आहे. तरी कडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या १ दिवसीय बीड जिल्हास्तरीय शेतकरी, लेखक, साहित्य संमेलनासाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा आष्टी, पाटोदा, शिरूर चे माजी आमदार ॲड. भीमरावजी धोंडे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. एस जी विधाते, उपाध्यक्ष डॉ. डी बी राऊत, कार्यवाह उपप्राचार्य डॉ. बी एस खैरे, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. पी. एन. आवटे, समन्वयक प्रा. डॉ. जी.पी बोडखे, प्रा. डॉ. एस.डी. गायकवाड, सदस्य प्राचार्य कर्ण तावरे, संजय कोथमीरे प्राचार्य अशोक गदादे, प्राचार्य दादासाहेब काळे, उपप्राचार्य डॉ. संजय धोंडे, विजयकुमार शिंदे आदींनी केले आहे.








