रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू, वरली-मटका, गांजा, गुटखा व इतर अवैध धंदे तात्काळ बंद करा..
अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणारे ठाणेदार निलेश सोळंके व हप्ते वसुल करत असलेले कर्मचारी अनंता कमळकर (गोपनीय विभाग) यांच्यावर कारवाई करण्याची मनसेची मागणी !
बातमी सम्राट | उज्वल अनिल जैस्वाल | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी | दि. ०४/१०/२०२६/
बुलडाणा : रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू, वरली-मटका, जुगार, गांजा, गुटखा व इतर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे आरोपही निवेदनातून करण्यात आले आहेत.
या गंभीर विषयाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले असून, रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये रायपूर व सैलाणी परिसरातील अवैध दारू विक्री, वरली-मटका, जुगार, गांजाची विक्री व वितरण, गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच निवेदनात रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्यावर अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचे आरोप करण्यात आले असून, पोलीस कर्मचारी अनंता कळमकर यांच्यावर हप्ते वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून आरोप तथ्यात्मक आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसेच्या प्रमुख मागण्या:
1. रायपूर परिसरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.
2. वरली-मटका व इतर जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात यावी.
3. अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
4. गांजाची विक्री, साठवणूक व वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
5. गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करण्यात यावी.
6. हप्ते वसुलीच्या आरोपांची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
7. संबंधित ठिकाणी गोपनीय चौकशी करून आवश्यक ती छापेमारी करण्यात यावी.
8. परिसरातील पोलीस गस्त वाढवून अवैध धंदे पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
“अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी; अन्यथा नागरिकांच्या सहकार्याने मनसे कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी उप तालुका अद्यक्ष अविनाश सुरडकर विभाग अद्यक्ष सागर इंगळे अंकुश बरँडवाल शुभम जाधव सागर खरे वैभव जाधव यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते








