युवकांनी ग्रामीण भागात लघुउद्योग सुरू करावेत : बापूसाहेब डोके यांचे प्रतिपादन…
दिगंबर बोडखे | आष्टी | दि.०४/१०/२०२६/
ग्रामीण भागातील युवकांनी शहराकडे स्थलांतर करण्यापेक्षा आपापल्या गावातच लघुउद्योग सुरू करावेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके यांनी केले.
अहिल्या नगर येथील निर्मल नगरच्या लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बापुसाहेब डोके बोलत होते.
पुढे बोलताना बापूसाहेब डोके यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातील युवक नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. त्यामध्ये मराठवाडा,विदर्भ या भागातील तरुण मोठ्या संख्येने शहराकडे येतात. मराठवाडा स्वातंत्र्या पूर्वी निजाम स्टेटमध्ये सामील होता. त्यामुळे त्या भागात अनेक गोष्टींचा विकास झाला नाही. विशेष करून बीड जिल्ह्याचा व बीड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात तर सतत दुष्काळ असतो. आधीच जमिनीचा पोत खडकाळ व डोंगरी आणि त्यात दुष्काळ सतत असतो. उसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याकडे जात असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट होते किंवा होतच नाहीत. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी युवक शहराकडे येतात. रोजगारासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, सुरत अशा ठिकाणी हजारोंच्या संख्येने जात असतात. मजुरी करतात परंतु यामुळे त्यांचे जीवन फार सुरक्षित न होता पोट भरण्यापुरते चालते. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे युवकांना सुख उपभोगायचे असल्यास ग्रामीण भागातच लघुउद्योग अथवा छोटा व्यवसाय आपले जागेवर व कमी भांडवलात सुरू करू शकतात.
शिक्षण घेतलेले व मेरिट मधील मुले चांगल्या नोकरीला लागून चांगले करिअर घडवतात परंतु अर्धवट शिक्षण घेतलेले तरुण काहीतरी कामगार बनण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या संख्येने कुशल कारागीर होतात .परंतु शहरात महागड्या गोष्टीमुळे त्यांना व्यवसाय करता येत नाही ,पोट भरणे एवढे शक्य आहे. अशा परिस्थितीत आता ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण होत आहे.
सोशल मीडिया मजबूत होत आहे, त्यामुळे मोठ्या शहरात बाजारपेठ मिळवणे शक्य आहे. आपल्या गावी आपल्या जागेत व कमी भांडवलात व्यवसाय करणे आता शक्य आहे. त्यातच आष्टी मतदार संघात व मतदार संघाबाहेर राष्ट्रीय महामार्ग ,दोन राज्य महामार्ग, पुणे – मुंबई पर्यंत पोहोचणारी रेल्वे गाडी उपलब्ध आहे. म्हणजेच आपले स्वस्तात तयार झालेले उत्पादन शहरापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. कोणत्याही विभागाकडे पोहोचण्यासाठी आता फक्त अर्धा ते एक तास लागतो. शहराच्या गर्दीच्या व महागड्या खर्चाच्या तुलनेत आपले घरी तयार केलेले उत्पादन चांगला नफा देऊ शकते याची सर्वोत्तम उदाहरणे म्हणजेच उल्हासनगर, चायना आहे. म्हणून स्वस्त दर्जेदार उत्पादन देऊन ग्रामीण भागात लघुउद्योग करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामीण युवकांनी तुटपुंजी नोकरी करून शहरातील हाल – अपेष्टा सहन न करता आपले भागात व आपले जागेत कमी भांडवलात लघुउद्योग व लघु व्यवसाय (व्यापार) सुरू करावेत. युवकांनी यासाठी व्यसन व राजकारण वर्ज्य करणे गरजेचे आहे असेही बापूसाहेब डोके यांनी सांगितले.








