जळगांव जिल्हा प्रतिनिधी: निलेश सोनवणे
जळगाव: “दुष्काळाच्या काळात शेतकऱ्याला सर्वाधिक गरज असते ती पाणी, वीज आणि चाऱ्याची. त्यात शेतीपंपासाठी दिवसा खात्रीशीर आठ तास वीज मिळाली, तर त्याची मोठी अडचण दूर होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही केवळ वीजपुरवठ्याची योजना नसून शेतकऱ्याच्या जीवनाला दिलासा देणारी योजना आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. साळवा रोडवरील नांदेड परिसरातील सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर परिसरातील सुमारे १,२९८ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना आता दिवसा आठ तास वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री पाटील यांचे आभार मानले.
महावितरणला स्पष्ट निर्देश-
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत, शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी येता कामा नयेत; शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रारीची तातडीने दखल घेऊन दोष दूर करावा, असे बजावले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक असून, गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना अधिकारी उपलब्ध झाला पाहिजे; गावपातळीवरील वीज समस्यांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी व ग्रामस्थांनी पाणी आणि विजेचा काटकसरीने व गरजेपुरताच वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० तसेच साळवा येथील सौर प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपशिक्षक भैया मराठे यांनी केले, तर आभार शाखा अभियंता ललित नारखेडे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती-
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एन. सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, शाखा अभियंता अतुल नारखेडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, शेतकी संघाचे चेअरमन शरद पाटील, पी. एम. पाटील, माजी सरपंच सुरेश नारखेडे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








