फुरूस, प्रतिनिधी : दिनेश हुमणे – ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन; भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस व शक्ती-तुरा जंगी सामना रंगणार. श्री खेमदेव मंदिर कल्याणकारी कमिटी, फुरूस यांच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव रविवार दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज रात्री ९.३० वाजता देवाची भव्य महाआरती होणार आहे. तसेच रेवाळेवाडी, पाटीलवाडी, कांगणेवाडी, कुंभवेवाडी, भुलेश्वरवाडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी व गुजरवाडी येथील भजन मंडळांकडून भजनसेवा सादर करण्यात येणार आहे. तसेच भुलेश्वरवाडी येथील नवरतवाडी जाखडी नृत्य विशेष आकर्षण ठरणार आहे.
ऑक्टोबर रोजी ह.भ.प. लक्ष्मण महादेव नवरत यांच्या सौजन्याने व सहकार्याने आळंदी येथील ह.भ.प. कु. सानिका ताई मोरे यांचे युवा कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मनोरंजक खेळ तसेच ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता गावातील मुले, मुली व महिलांचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. मदन विठू खामकर यांच्या सौजन्याने व सहकार्याने वारकरी सांप्रदाय ता. चिपळूणचे उपाध्यक्ष, कीर्तनकार ह.भ.प. प्रमोद महाराज राणे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता गावातील बालगोपाळांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ‘शक्ती-तुरा जंगी सामना’ रंगणार आहे. यामध्ये शक्तीवाले शाहीर श्री. संकेत दळवी, आंबडस देऊळवाडी, ता. खेड आणि तुरेवाले शाहीर कु. किरण चांदिवडे, मु.पो. चिखली, ता. गुहागर यांचा सहभाग राहणार आहे. तसेच कविराज अविनाश कडू शाखा – भुलेश्वर नृत्य कलापथक, फुरूस यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. सीताराम पांडुरंग नवरत यांच्या सौजन्याने व सहकार्याने आळंदी देवाची येथील ह.भ.प. नित्यानंद महाराज कांगणे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या नवरात्रोत्सवाचे नियोजन श्री खेमदेव कल्याणकारी कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार निवळकर, उपाध्यक्ष समीर पवार, सचिव दिनेश नवरत, उपसचिव लक्ष्मण घरवे, खजिनदार सुधीर मोरे, सर्व कमिटी सदस्य, सल्लागार, ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खेमदेव मंदिर कल्याणकारी कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.








