कर्तव्यदक्ष ठाणेदार भागवत मुळीक यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाचा आदर्श गणेश उत्सव मंडळाकडून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भव्य गौरव
गणेशोत्सव 2026 ची विसर्जन मिरवणूक पिंपळगाव राजा येथे अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. भाविकांच्या उत्साहाला शिस्तीची जोड देत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता ही मिरवणूक यशस्वी करून दाखवणाऱ्या पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यनिष्ठ पथकाचा आदर्श गणेश मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनताभिमुख ठाणेदार श्री. भागवत मुळीक साहेब व त्यांच्या संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत आदर्श गणेश उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी गावातील दानशूर, समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले श्री. सुदेश शांतीलाल झांबड यांनी ठाणेदार श्री. भागवत मुळीक साहेब यांचे सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
त्यानंतर आदर्श गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, विसर्जन मिरवणुकीत पोलीस दलाने दाखवलेली तत्परता, संयम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. रात्रंदिवस उन्हा-पावसाची तमा न बाळगता, स्वतःच्या कुटुंबाची काळजी बाजूला ठेवून जनतेच्या रक्षणासाठी झटणाऱ्या या खाकी वर्दीतील रक्षकांमुळेच भाविकांना सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देता आला. पोलीस दल म्हणजे समाजाचा खरा आधारस्तंभ आहे.
तसेच गावातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आदर्श गणेश उत्सव मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास, आपुलकी आणि एकतेचे नाते अधिक दृढ करणारा हा आदर्श उपक्रम इतर मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
या सत्कार सोहळ्यामुळे पोलीस दलाचे मनोबल नक्कीच उंचावले असून, अशीच सेवा आणि सहकार्याची भावना कायम राहो, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.








