तीन एकर कोबीवर फिरवला रोटावेटर…
किलो ला दोन रुपयांचा भाव मिळाल्याने नागडे येथे गुलाब सोनवणे यांचा संताप !
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी | दि.११/१०/२०२६/
दुष्काळाच्या झळा सोसत, पाण्याचे काटेकोर नियोजन करून तीन एकरांवर उभे केलेले कोबीचे पीक बाजारभावाच्या पडझडीमुळे अक्षरशः मातीत मिसळण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. नागडे शिवारातील शेतकरी गुलाबराव सोनवणे यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीला अवघा दोन रुपये किलोचा भाव मिळू लागल्याने संतप्त होऊन पिकात मेंढ्या चरण्यास सोडल्या. त्यानंतर रोटावेटर फिरवून संपूर्ण उभे पीक नष्ट केले. बाजारभावाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्याला उत्पादन खर्चही वसूल करता येत नसल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.यावर्षी परिसरात दुष्काळाचे तीव्र सावट असल्याने शेतीसाठी पाण्याची उपलब्धता मोठी समस्या बनली आहे.अशा परिस्थितीतही सोनवणे यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून तीन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली.भाजीपाला पिकातून उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने रोपे, मजुरी, रासायनिक खते, निंदणी तसेच ट्रॅक्टर मशागत यासाठी त्यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले.
पीक काढणीला आल्यानंतर सुरुवातीला कोबीला साडेसहा रुपये किलोचा भाव मिळाला. त्यातून १२ टनाची एक गाडी बाजारात पाठवून सुमारे ८० हजार रुपये मिळाले. मात्र, त्यानंतर बाजारातील आवक वाढल्याने भाव झपाट्याने घसरला. कोबीचा दर अवघा दोन रुपये किलोवर आला.उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने उर्वरित पीक विकणेही परवडेनासे झाले. त्यातच व्यापाऱ्यांकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले.
अशा परिस्थितीत उभ्या पिकाची काढणी, वाहतूक आणि बाजारात विक्री करण्यासाठी होणारा खर्चही परवडत नसल्याने सोनवणे यांनी तीन एकर कोबीच्या शेतात मेंढ्या सोडल्या. त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने उभे पीक नष्ट केले. कष्टाने उभे केलेले पीक स्वतःच्या डोळ्यांसमोर नष्ट करण्याची वेळ आल्याने ते भावनिक झाले.भाजीपाला पिकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आवक वाढली की दरात मोठी घसरण होते. परिणामी उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याची व्यथा सोनवणे यांनी व्यक्त केली. केवळ शासनाला दोष देण्याऐवजी बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून पीक नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.








