मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी
अकोला: सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सायबर जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क, अकोला येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर , कर्मयोगी संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या दिव्य प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यांत आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एच.बी.नानवाला होते. या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकूंद भारसाकळे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अकोला खदान पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी वानखडे उपस्थित होत्या. त्यांनी सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल कोमल पावडे, करिष्मा गावंडे व गंगासागर आटोळे यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
पोलीस उपनिरीक्षक वानखडे यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप, ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धती, बनावट लिंक, ओटीपी, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि डिजिटल व्यवहार करताना खबरदारी घ्यावी , असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, सायबर गुन्हा घडल्यास घाबरून न जाता,तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महाविद्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंधक कक्ष (Sexual Harassment Cell) याची माहिती देत, लैंगिक छळाच्या घटना टाळण्यासाठी जागरूकता, सुरक्षित वातावरण आणि तक्रार निवारण यंत्रणेचा योग्य वापर याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अशोक शिरसाट यांनी केले. प्रा.योगेश फरपट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली.आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य प्रा. डॉ.एच.बी.नानवाला विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने व सुरक्षितपणे वापर केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध सुत्रसंचालन प्रा.पूनम चिखलकर यांनी केले, तर प्रा.कोमल आठवले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती.








