बातमी सम्राट | टाकळीभान प्रतिनिधी | संदीप जाधव
टाकळीभान : राज्य महामार्ग क्रमांक ४४ वरून जाताना लागणारा टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवायचे की समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू द्यायची, असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा राहत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याचे शुक्लकाष्ट कधी संपणार, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सदर रस्ता बारा फूट रुंदीचा अपेक्षित असताना तत्कालीन ठेकेदाराने प्रत्यक्षात केवळ आठ फूट रस्ता तयार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्यांवर प्रत्येकी दोन फूट किंवा त्याहून अधिक खोल खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी अवघा सहा फूट रस्ता शिल्लक राहिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, समोरून एखादे वाहन आल्यास वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
त्यातच सध्या ऊस हंगाम सुरू झाल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहून नेणारे डबल-ट्रिपल ट्रेलर तसेच मोठे ट्रक या अरुंद रस्त्यावरून धावत असल्याने अपघाताची भीती अधिकच वाढली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांसह दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याची दुरवस्था आणि अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वाहतूकदार, संबंधित साखर कारखाने की तालुक्याचे आमदार आणि खासदार, यापैकी जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आमदार, खासदार आणि संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, साइडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, रस्त्याच्या रुंदीचा प्रश्न मार्गी लावावा आणि नियमबाह्य अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या गंभीर समस्येची लवकरात लवकर सोडवणूक न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिला आहे. आता लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन या समस्येची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








