बातमी सम्राट | टाकळीभान प्रतिनिधी | संदीप जाधव
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील रिक्त झालेल्या नाऊर, पढेगाव व खंडाळा या गावांसह संभाव्य रिक्त होणाऱ्या टाकळीभान येथील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली.
महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी यांच्या दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबविण्यात आली. महसूल सेवक पदांच्या भरतीसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोडतीकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले होते.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी गोंधवणी येथील सहा वर्षीय अरुष अंकुश शेळके याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या सोडतीनुसार नाऊर गावातील महसूल सेवक पदासाठी भटक्या जमाती-ड (भ.ज.ड.) प्रवर्ग, पढेगावसाठी खुला प्रवर्ग, खंडाळा गावासाठी खुला प्रवर्ग (महिला), तर संभाव्य रिक्त होणाऱ्या टाकळीभान गावातील पदासाठी इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) असे आरक्षण निश्चित करण्यात आले.
या आरक्षण सोडतीप्रसंगी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, संजय गांधी निराधार योजना शाखेचे नायब तहसीलदार शेकटकर, कुळकायदा अव्वल कारकून शिंदे मॅडम, महसूल सहाय्यक सांगळे भाऊसाहेब, महसूल सेवक दिगंबर भोंडगे, सुनील देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महसूल सेवक पदांच्या भरती प्रक्रियेतील आरक्षण सोडत पूर्ण झाल्याने संबंधित गावांतील इच्छुक उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.








