मनसे उप तालुका अध्यक्ष अविनाश सुरडकर यांच्या उपस्थितीत विवेकानंद बराटे यांचे उपोषण स्थगित….
उज्वल जैस्वाल | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी | दिनांक १९/१०/२०२६/
अमडापूर पोलिसांचे लेखी आश्वासन; जमिनीच्या मालकी हक्क व सोयाबीन पिकाच्या कथित चोरीप्रकरणी चौकशीची मागणी
चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथील रहिवासी विवेकानंद ज्ञानदेव बराटे यांनी गट क्रमांक ५० व ८५ मधील जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात तसेच संबंधित जमिनीवरील सोयाबीन पिकाची काढणी करून ते घेऊन गेल्याच्या आरोपावरून संबंधितांविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणाची योग्य चौकशी करून न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते.
या प्रकरणाची दखल घेत अमडापूर पोलीस स्टेशनच्या वतीने उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये संबंधित तक्रारीची पुढील सात दिवसांत योग्य चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपोषण स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष अविनाश सुरडकर यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून विवेकानंद बराटे यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणात न्याय मिळावा आणि तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
पोलिसांकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीच्या अपेक्षेने उपोषण स्थगित करण्यात आले.
“शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही; योग्य चौकशी करून न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधितांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी भूमिका मनसे उपतालुका अध्यक्ष अविनाश सुरडकर यांनी व्यक्त केली
आता संबंधित प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती चौकशी केली जाते आणि तक्रारदाराला न्याय मिळतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.यावेळी मनसे शाखा सचिव दीपक भोसले संतोष उबरहंडे यांचे सह अन्य कार्यकर्ते उपस्तीत होते








