शासकीय आदेश रद्दीच्या भावात ! मोताळा पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह …
उज्वल जैस्वाल | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी |
मोताळा : दिनांक १९ऑक्टोबर२०२६ पंचायत समितीतील प्रशासकीय दिरंगाई आणि चौकशीतील कथित निष्क्रियतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोथळी येथील जागरूक नागरिक निजाम शाह यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता, जन्म-मृत्यू नोंदीतील गैरव्यवहार आणि अतिक्रमणाच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन केले.
निजाम शाह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षात गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) विविध तक्रारींच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी आर. जी. तायडे यांना तब्बल २० लेखी आदेश दिले. मात्र, या आदेशांनंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
‘आदेशांची किंमत रद्दीपेक्षाही कमी!’
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निजाम शाह यांनी पंचायत समितीत २० शासकीय आदेश आणि रद्दीचे कागद सोबत आणले. “रद्दीला किलोमागे ४५ रुपये भाव मिळतो; मात्र या शासकीय आदेशांना रद्दी म्हणूनही कोणी स्वीकारायला तयार नाही,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनामुळे मोताळा पंचायत समितीतील प्रशासकीय कार्यपद्धती आणि तक्रारींच्या निपटाऱ्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता या प्रकरणाची वरिष्ठ प्रशासन दखल घेऊन संबंधित आदेशांवरील कार्यवाहीची चौकशी करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








