मीटर ८७.९७ टक्के स्लो केल्याचे तपासणीत उघड; १३ हजार ३०० रुपयांचे बिल थकीत
राहुरी प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी तालुक्यातील डावखर वस्ती येथे वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश केशव डौले, ललित केशव डौले आणि दीपक केशव डौले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या राहुरी ग्रामीण शाखेतील सहाय्यक अभियंता सतीश अशोकराव चारभे यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वीजचोरीविरोधी मोहिमेदरम्यान महावितरणच्या पथकाने डावखर वस्ती येथील संबंधित वीज मीटरची तपासणी केली. त्यावेळी मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आल्याने ग्राहकाच्या उपस्थितीत मीटर सील करण्यात आले.
त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर येथील मीटर चाचणी कक्षात या मीटरची सविस्तर तपासणी करण्यात आली. यावेळी मीटर कापून त्यात फेरफार केल्यानंतर पुन्हा जोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच मीटरची गती ८७.९७ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचा निष्कर्ष तपासणी अहवालात नोंदविण्यात आला.
यापूर्वीही वीजचोरी उघड
याच वीज जोडणीची २८ मे २०२६ रोजी तपासणी केली असता, वीज खांबावरून मीटरकडे येणाऱ्या तारेला अतिरिक्त वायर जोडून वीज वापरल्याचे आढळले होते. त्यावेळी महावितरणने वीजचोरीचे बिल आणि कंपाउंडिंग शुल्क आकारले होते. संबंधित ग्राहकाने ती रक्कम भरली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचा आरोप महावितरणने केला आहे.
महावितरणच्या मूल्यांकनानुसार, संबंधित निवासी वीज जोडणीतून ६८४ युनिट विजेची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. या वीजचोरीपोटी १३ हजार ३०० रुपयांचे मूल्यांकन बिल आकारण्यात आले होते. मात्र, ही रक्कम अद्याप भरलेली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी लोकेश, ललित आणि दीपक डौले या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.








