पिंपळगाव फुणगी परिसरातील घटना; वाहनाखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद, कलम ३०७ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल
राहुरी प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकालाच धमकावल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्रांताधिकारी विनीत शिर्के यांच्या पथकाने प्रवरा नदीपात्रातील लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून परतत असताना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिंपळगाव फुणगी परिसरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लाकडी दांडके व लाठ्यांचा धाक दाखवून शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, तसेच वाहनाखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रांताधिकारी विनीत शिर्के हे एमएच १७ बीएस ४५०० क्रमांकाच्या शासकीय वाहनातून प्रवरा नदीपात्रातील लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून परतत होते. चिंचोली गावाकडून पिंपळगाव फुणगीच्या दिशेने जात असताना त्यांना पांढऱ्या रंगाचे कॅबिन, निळ्या रंगाचा हौदा आणि ‘धनलक्ष्मी’ असे नाव असलेला मुरूम भरलेला हायवा डंपर आढळून आला.
या डंपरवरील चालक धनराज चौधरी आणि दीपक ऊर्फ प्रवीण बनबन लाटे यांच्यासह अन्य व्यक्तींनी लाकडी दांडके व लाठ्यांचा धाक दाखवून शासकीय पथकाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहनाखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यात प्रवरा नदीपात्रासह विविध भागांत गौण खनिजाच्या उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न वारंवार चर्चेत येत असतो. अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मैदानात उतरतात. मात्र, अशा कारवाईदरम्यान शासकीय पथकालाच धमकावल्याचा प्रकार समोर आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे आणि कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावणे यांसारख्या प्रकारांमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाईसमोर आव्हान उभे राहत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.
■ तडीपार आरोपीचा वाळूतस्करीत वावर? प्रशासन अनभिज्ञ की दुर्लक्ष?
चिंचोली-पिंपळगाव शिवारात दीपक लाटे हा तडीपार असल्याची चर्चा असून, तो कथितरीत्या वाळूतस्करीत सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. हा दावा खरा असल्यास तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी होतेय कुठे? संबंधिताला नेमका कोणाचा वरदहस्त आहे? शासकीय पथकालाच धमकावण्याची हिंमत होत असेल, तर अवैध वाळू वाहतुकीला आळा घालणार कोण? या गंभीर प्रश्नांची उत्तरे महसूल आणि पोलीस प्रशासनाने द्यावीत. संबंधित तडीपारीचा आदेश आणि कथित वाळूतस्करीची अधिकृत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.








