मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे; ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन
रायपूर, दि. २९ ऑक्टोबर : सैलानी येथील बिबन बाबा दर्ग्याजवळील साया गेस्ट हाऊससमोर आंब्याच्या झाडाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी सैलानी येथील साया गेस्ट हाऊससमोर, बिबन बाबा दर्ग्याजवळ अयुब शेख यांच्या गट क्रमांक ३३६ मधील आंब्याच्या झाडाखाली हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित प्रकरणाची नोंद केली.
मृत व्यक्तीचा रंग सावळा असून, उंची अंदाजे पाच फूट आहे. त्याचे केस काळे आहेत. मृतदेहावर निळसर-पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट असून, त्यावर ‘संध्या ग्रुप’ असे लिहिलेले आहे. तसेच काळसर रंगाची पॅन्ट, उजव्या हातात पितळी कडे आणि पायात काळ्या रंगाची चप्पल असे त्याचे वर्णन आहे. मृत व्यक्तीजवळ ओळख पटविण्यासाठी कोणतेही कागदपत्र आढळून आलेले नाही. मृतदेह बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ३४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
वरील वर्णनाशी साधर्म्य असलेली व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास किंवा या व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास रायपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खराडे आणि पोलीस अंमलदार अझरुद्दीन काझी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
संपर्क :
- पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खराडे : ८४२१६१३३८२
- पोलीस अंमलदार अझरुद्दीन काझी : ९३७०९६१९९२
— निलेश सोळंके, ठाणेदार, पोलीस स्टेशन रायपूर








