नगरोत्थान व दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते, पथदिवे आणि विद्युत यंत्रणांची कामे मार्गी; हर्षदादा तनपुरे यांची माहिती
राहुरी प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) तसेच नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शहरातील रस्ते, पथदिवे आणि विद्युत सुविधांमध्ये सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती राहुरी नगरपरिषदेचे गटनेते व उपनगराध्यक्ष हर्षदादा तनपुरे आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राहुरी नगरपरिषदेत विकास आघाडी सत्तेत आल्यापासून माजी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्तदादा तनपुरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. शहरातील मूलभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नगरपरिषदेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
या विकासकामांना मिळाली प्रशासकीय मान्यता
नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दीतील नगर-मनमाड महामार्ग ते शनी चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच राजश्री हॉटेल ते जुना देवळाली रोड या रस्त्याचे डांबरीकरण आणि छत्रपती नगरमधील उर्वरित रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक १० मधील किरण तनपुरे यांच्या घरापासून काळे आखाडा रोडपर्यंत तसेच कादरी मंडप ते ग्लोबल शाळेपर्यंत पथदिवे बसविण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधील विविध ठिकाणी पथदिव्यांचे खांब उभारण्यात येणार असून, मुळा धरण पंप हाऊस येथे एपीएफसी (APFC) पॅनेल बसविण्याच्या कामालाही मान्यता मिळाली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील ज्ञानेश्वर थिएटरच्या मागील बाजूस हायमास्ट दिव्याचा खांब उभारण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष तथा गटनेते हर्षदादा तनपुरे यांच्यासह विकास आघाडीच्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरातील विविध भागांतील मूलभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून राहुरी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंजूर झालेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. तसेच प्रस्तावित विकासकामांनाही मंजुरी मिळवून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. शहराच्या विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, मंजूर कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती गटनेते व उपनगराध्यक्ष हर्षदादा तनपुरे यांनी दिली.








