{ समीर बल्की तालुका प्रतिनिधी }
भिसी, दि. 14 ऑगस्ट 2026 : समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत पोलीस स्टेशन भिसी, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन भिसी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशन भिसी हद्दीतील नागरिक व बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन जीवन ज्योती ब्लड सेंटर, नागपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले.
हे शिबिर माननीय पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. आयुष निपाणी सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर श्री. दिनकर ठोसरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन भिसी येथील अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच PSI मुळे, ASI बाळकृष्ण जिभकाटे, राजेश वर्हाडे, प्रविणा, सतीश झिल्पे, सतीश जिवतोडे आणि मंगेश चौधरी यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान हे जीवनदान असून, एका रक्तदात्याच्या रक्तामुळे गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. पोलीस विभागाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“रक्तदान करा, जीवन वाचवा” या संदेशातून पोलीस स्टेशन भिसीने समाजासमोर सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण केला आहे.








