ध्वजारोहण उरकून कारभारी पसार निचपूर ग्रामपंचायतीला कुलूप
राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची दोन वर्षांपासून ग्रामसभाही गुंडाळली
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात साजरा होत असताना, किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायतीमध्ये मात्र अत्यंत गंभीर आणि बेजबाबदार प्रकार समोर आला आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा औपचारिक कार्यक्रम उरकताच सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी काही वेळातच घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून सर्व जबाबदार व्यक्ती घरी निघून गेल्याने राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडला गेला आहे.
स्वातंत्र्यदिनी शासकीय इमारतींवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाची योग्य मान-मर्यादा राखणे आणि त्याची सुरक्षा निश्चित करणे ही स्थानिक प्रशासनाची मुख्य जबाबदारी असते. मात्र, निचपूर ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणानंतर परिसरात एकही जबाबदार कर्मचारी किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. ओस पडलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा बंद दरवाजा आणि फडकणारा ध्वज पाहून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ध्वजाच्या सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
केवळ ध्वजारोहणाच्या दिवशीच नव्हे, तर एकूणच कारभारात निचपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गावात एकही ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नाही. लोकशाहीत ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असताना आणि गावातील विकासकामे, समस्या यावर चर्चा होणे गरजेचे असताना, प्रशासनाने ग्रामसभाच गुंडाळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
राष्ट्रीय सणाच्या दिवशी दाखवलेला हा निष्काळजीपणा आणि गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेण्याचा मनमानी कारभार या दोन्ही गोष्टी प्रशासकीय अवहेलनेचा उत्तम नमुना आहेत. याप्रकरणी संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि निष्काळजी पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी निचपूर येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे.
व्हिडीओ पहा —








