सेंद्रिय शेती व संशोधन केंद्रात ‘आर्थिक ज्ञान व्यवस्थापन’ प्रशिक्षण संपन्न
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सेंद्रिय शेती व संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण हॉलमध्ये दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशिक्षणार्थींसाठी ‘आर्थिक ज्ञान व्यवस्थापन तसेच उद्योगासाठी कर्ज व शासकीय योजनांचा लाभ’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
किसान मित्र फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) अंतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास एकूण ५० प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
आर्थिक व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रियंका नालकर गाडे यांनी प्रशिक्षणार्थींना आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन तसेच विविध शासकीय योजनांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच रिनोव्हेट इंडिया, मुंबईच्या मृणाली ठाकूर यांनी उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून घेण्याच्या विविध प्रक्रियांबाबत तांत्रिक व व्यावहारिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनीही विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली.
ग्रामीण व कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना उद्योगाची आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्यासाठी तसेच उपलब्ध कर्ज सुविधा व शासकीय योजनांचा प्रभावीपणे लाभ घेण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किसान मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर अडसुरे, तसेच मोरे, किरण विधाटे आणि गायत्री माने यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थींना आर्थिक नियोजन व उद्योगविकासासाठी आवश्यक ज्ञान मिळाले.








