पिंपळाचा मळा येथील व्हिजन शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी : पिंपळाचा मळा परिसरातील सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित व्हिजन प्लेस्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
मुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका व सचिव-संचालक तथा मुख्याध्यापिका मिस शेख शर्मिन यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी श्रीमती संचिता सुनील भालेराव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानिमित्त प्लेस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस व रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास श्रीमती सानिका अविनाश ढवळे, श्रीमती रोहिणी दीपक विधाटे, मिस माया पाटेकर, मिस श्रद्धाताई यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








