देशाच्या अभिमानातून शेवटच्या दोन सेकंदात ॲथलेटिक्समध्ये मिळवले सुवर्ण
भारताला तीन पदक मिळवणाऱ्या श्रावणी सांगळेचा येवल्यात भव्य नागरी सत्कार
राजापूर प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
आशियाई २३ वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शर्यतीदरम्यान शेवटच्या टप्प्यात अवघ्या दोन सेकंदांवरून सुवर्ण पदक जाणार असे वाटत होते मात्र हे पदक मला भारतासाठी जिंकायचे आहे हा विचाराने संपूर्ण ताकद, प्रयत्न पणाला लावले आणि अखेर सुवर्ण पदक जिंकले.जिद्द,प्रचंड मेहनत आणि देशाविषयीचा अभिमान असला की यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन चीनमध्ये खेळलेली नाशिकची भूमिपुत्र खेळाडू सर्वांनी सांगळे हिने केले.
चीनमध्ये नुकतीच आशियाई २३ वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ पार पडली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकची कन्या नायगाव (ता. सिन्नर) येथील श्रावणी सांगळे या सुवर्णकन्येने ऐतिहासिक कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवून पदकांची हॅट्रिक केली असून सातासमुद्रापार भारताचा आणि महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे.
या यशाबद्दल येथील राष्ट्रसंत भगवानबाबा सत्कार समितीच्या वतीने तिचा भव्य दिव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी तिने आपल्या यशाचे रहस्य सांगितले.
येथील आसरा लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रावणीसह पालक सचिन सांगळे व सविता सांगळे यांचाही सन्मान करण्यात आला.प्रारंभी चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत श्रावणीने ४x४०० मीटर मिक्स रिले आणि महिलांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत (हर्डल्स) कांस्य पदक जिंकले. मिक्स रिले शर्यतीमध्ये शेवटच्या ५० मीटरमध्ये चीनच्या धावपटूला अवघ्या ०.१० सेकंदाच्या फरकाने मागे टाकत श्रावणीने भारताला थरारक विजय मिळवून दिल्याची चित्रफीत दाखविण्यात आली.
श्रावणी यांची प्रकट मुलाखत यावेळी प्रसिद्ध साहित्यिक विवेक ऊगलमुगले यांनी घेतली.
नाशिक येथील व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशन’मध्ये प्रशिक्षक वैजनाथ कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसातून दोन वेळा कडक सराव असतो आणि गेली १० वर्षे हा सराव अविरत सुरू आहे. माझ्या या यशामध्ये माझ्या प्रशिक्षकांसोबतच माझ्या परिवाराची खूप मोठी मेहनत आहे. त्यांचा पाठिंबा कायम राहिल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकल्याचे तिने सांगितले.चीन सारख्या देशात भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केल्याचा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोलाचा आहे.भविष्यातही ऑलिंपिक व आतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून भारताचा नावलौकिक करण्याचा मानस असल्याचे श्रावणीने सांगितले,यासाठी परिश्रमात आणि सरावात कुठलाही तडजोड करणार नसल्याचेही ती म्हणाली.
आमदार किशोर दराडे म्हणाले,एका सामान्य कुटुंबातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी कामगिरी करून देशासाठी पदके जिंकतो, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.हे यश फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.येत्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः विधानपरिषदेत श्रावणीच्या शासकीय मदतीचा, सन्मानाचा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रावणीचे यश जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, सत्कार समितीने तिच्या कार्याचा गौरव करून तिला अजूनच प्रेरणा दिल्याचे मत युवा नेते कुणाला दराडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. कविता दराडे, ऍड. उत्तम नागरे, डॉ. ईश्वर आव्हाड, डॉ. विलास कांगणे यांनी मनोगत व्यक्त करून तिचे कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, नगरसेवक रुपेश दराडे, माजी सरपंच प्रसाद पाटील, धनराज पालवे, विशाल पालवे, प्रकाश काकड, डॉ. भाऊराव सांगळे, ज्ञानेश्वर आंधळे, मिलिंद पाटील, अजित सानप, सुहास अलगट, दत्ता सानप, प्रमोद बोडके, भाऊसाहेब कांगणे, दत्ता सानप, ज्ञानेश्वर मुंढे आदींसह सत्कार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
येवला : आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रावणी सांगळे हिचा सत्कार करताना आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे,सचिन सांगळे व पदाधिकारी








