वाघाच्या हल्ल्यात चार वर्षांचा गोरा ठार; पुयारदंड परिसरात भीतीचे वातावरण
समीर बल्की | तालुका प्रतिनिधी
चिमूर : तालुक्यातील पुयारदंड येथे वाघाच्या हल्ल्यात चार वर्षांचा गोरा ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुयारदंड येथील शेतकरी विठ्ठल किसन कानफाडे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात चार वर्षांचा गोरा जागीच ठार झाला. यापूर्वीही परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन कालवडी ठार झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे शेतकरी कानफाडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाईची मदत द्यावी तसेच शेतीची कामे सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नवीन जनावरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. “आर्थिक मदत मिळाली तरी नवीन जनावरे लगेच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प होतात,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून वाघाच्या हालचालींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभागप्रमुख समीर बल्की यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने त्यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.








