सांगोल्यात वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; वाहनधारकांकडून समान कारवाईची मागणी
सांगोला विशेष | प्रतिनिधी : विकास गंगणे
सांगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, काही वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत वाहनधारक व नागरिकांकडून तक्रारी समोर येत असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना सर्व वाहनधारकांशी समान आणि कायदेशीर पद्धतीने वागणे अपेक्षित आहे. मात्र, काही वाहनधारकांना वारंवार अडवून नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच दंडात्मक कारवाईव्यतिरिक्त विविध कारणांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. या आरोपांची सत्यता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याच्या चर्चेनेही प्रश्नचिन्ह
दरम्यान, काही वाहतूक कर्मचाऱ्यांचे स्थानिक राजकीय व्यक्तींशी असलेले संबंध व उठबस याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा गटाच्या प्रभावापासून दूर राहून निष्पक्षपणे कायदा व सुव्यवस्था राखणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याचे चित्र निर्माण झाल्यास त्याचा जनमानसावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
यातील एका वाहतूक कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये विशेष नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कर्मचारी आपल्या पदाच्या शिस्तीपेक्षा ‘सेलिब्रिटी’प्रमाणे वावरत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौकाचौकात तरुणांच्या घोळक्यात बसून गप्पा मारणे तसेच पोलिस कर्मचाऱ्याला अपेक्षित असलेल्या शिस्तीला बाधक ठरू शकणाऱ्या वर्तनाबाबतही तक्रारी करण्यात येत आहेत.
सर्वसामान्य वाहनधारकांवरच कारवाई का?
अनेक वाहनधारकांनी कर्ज काढून वाहने घेतली असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, अनावश्यक त्रास किंवा नियमबाह्य आर्थिक मागणी होत असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अशी भावना निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना आर्थिक अथवा राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य वाहनधारकांना वेगळा न्याय मिळत असल्याची भावना निर्माण झाल्यास पोलिस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो.
त्यामुळे वाहतूक कारवाईत पारदर्शकता, समानता आणि कायद्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींची सत्यता तपासण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सांगोला पोलिस ठाणे परिसरातील नागरिकांच्या मनातील नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन वाहतूक विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि नागरिकाभिमुखता आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा; सुरक्षित राहा.








