स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किनवट मध्ये -युवा संमेलन पार पडले.
प्रतिनिधी- मार्कंडेय सिरमवार
किनवट : या संमेलनाचे अध्यक्ष श्री विनोदजी मुंडे, संचालक यशवंत अकॅडमी, आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री साहेबराव पवार गुरु स्वामी हे होते. याप्रसंगी बोलताना विनोद मुंडे सर म्हणाले की आपल्याला महापुरुषांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला आहे, पण हे शिक्षण आणि हा संघर्ष केवळ आपल्या जातीपुरता मर्यादित न ठेवता सर्व समाजाला याचा उपयोग व्हावा. प्रमुख वक्ते म्हणून देवगिरी प्रांताचे सहप्रांत प्रचारक श्री राजेंद्र जी कोळपे होते.
उपस्थित दीडशे तरुणांना उद्बोधन करताना ते म्हणाले की हा देश आपला आहे, आणि ज्या गोष्टीला आपण आपले म्हणतो त्याला नीट करण्याची जबाबदारी आपली आहे. आज समाजातील बऱ्याच लोकांमध्ये ‘मी भारतीय आहे’ याचा अभिमान वाढताना दिसत आहे. ही निश्चितच सकारात्मक आणि आशादायी परिस्थिती आहे असे ते म्हणाले.
प्रश्नोत्तरांच्या सत्रात तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील त्यांनी उत्तरे दिली. चांगला देशभक्त नागरिक बनवण्याचे काम संघ करतो. आणि हे देशभक्त नागरिक समाजाच्या विविध क्षेत्रात जाऊन सेवा कार्य करतात असे त्यांनी सांगितले. आपत्तीच्या वेळी केलेली मदत, तसेच सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळासारख्या समाजाची सर्वांगीण उन्नती करणाऱ्या स्थायी संस्था अशी दहा-बारा उदाहरणे त्यांनी तरुणांना दिली.
तरुणांनी तोडण्याच्या कामात सहभागी न होता जोडण्याच्या कामात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात किनवट आणि परिसरातील दीडशे तरुणांनी सहभाग नोंदवला.








