मर्दडी ते रायपूर ‘हर हर महादेव’चा गजर
भव्य कावड शोभायात्रेने रायपूर दुमदुमले; तांडव ग्रुप रायपूरसह शिवभक्तांचा उत्साह शिगेला
प्रतिनिधी : उज्वल जयस्वाल
श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (ता. १७) मर्दडी ते रायपूर भव्य कावड शोभायात्रा काढण्यात आली. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण रायपूर परिसर दुमदुमून गेला. मर्दडी माता मंदिर तीर्थस्थळावरून पवित्र जल घेऊन निघालेल्या शिवभक्तांनी रायपूर येथील शिवमंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला.
कावड यात्रेत तांडव ग्रुप रायपूर यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला. भल्या मोठ्या शिवप्रतिमा, आकर्षक कावडी, भगवे ध्वज आणि खांद्यावर कावड घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या शिवभक्तांमुळे मर्दडी ते रायपूर मार्ग भक्तिमय झाला होता.
पहाटे तीन वाजल्यापासूनच ग्रामीण भागातील विविध ठिकाणी कावड यात्रांची धूम सुरू झाली. मर्दडी येथून कावड शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी शिवभक्तांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कावडधाऱ्यांसाठी चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी शुभेच्छा फलक लावून यात्रेचे स्वागत केले.
श्रावणातील सोमवारला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवपिंडीवर पवित्र जल अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार विविध कावडधारी मंडळांनी तीर्थस्थळांवरून जल आणून महादेवाचा जलाभिषेक केला.
डीजेच्या तालावर शिवभक्तांचा जल्लोष डीजेच्या गजरात भगवान शंकराच्या भक्तिगीतांवर शिवभक्तांनी उत्साहात जल्लोष केला. कावडधाऱ्यांचा उत्साह, शिवप्रतिमा आणि भगव्या ध्वजांनी शोभायात्रेला विशेष रंगत आणली. मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाल्याने रायपूर परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त कावड शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शोभायात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मार्गावर विशेष लक्ष ठेवले. संबंधित शिवमंदिरात जलाभिषेक केल्यानंतर कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला.
मर्दडी ते रायपूर निघालेल्या भव्य कावड शोभायात्रेत तांडव ग्रुप रायपूरसह शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग.








