रेती माफियाविरोधात पत्रकारांचे एल्गार; चिमूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन
चिमूर तालुक्यातील रेती तस्कर प्रथम बाळबूधे यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी; व्हायरल ऑडिओ क्लिपची प्रशासकीय चौकशी करण्याचे साकडे — न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पत्रकारांचा इशारा
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर, दि. १६ ऑगस्ट २०२६ : अवैधरित्या रेती उपसा चिमूर तालुक्यातील नेरी परिसरात सुरू असल्याचा आरोप आणि अवैध रेती उत्खनन, चोरी, वाहतूक व विक्रीविरोधात पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध रेती तस्करीला तातडीने आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी शहीद स्मृती दिनाचे औचित्य साधून चिमूर तहसील कार्यालयासमोर पत्रकारांनी एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे तालुक्यातील रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रशासनाच्या ऐरणीवर आला आहे.
नेरी परिसरातील जंगल तसेच उसेगाव नदीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध चोरी होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या पत्रकारांनी केला. या प्रकारामुळे शासनाच्या नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणावरही परिणाम होत असल्याचे पत्रकारांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
रेतीची अवैध चोरी, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर महसूल व संबंधित विभागांनी कठोर कारवाई करावी. तसेच या गैरप्रकाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठबळ देणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
१४ मागण्यांसाठी पत्रकारांचा प्रशासनावर दबाव
या लक्षवेधी आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे १४ विविध मागण्या रेटून धरल्या. रेती माफियांच्या कारवायांवर नियमित पाळत ठेवावी, अवैध रेती वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे आणि रेती तस्करीसंदर्भात यापूर्वी पत्रकारांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
विशेषतः प्रथम बाळबूधे यांच्याविरोधात पत्रकारांनी सादर केलेल्या व सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या आधारे निष्पक्ष प्रशासकीय चौकशी करून, त्यात तथ्य आढळल्यास कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली.
तसेच पत्रकारांनी रेती तस्करीसंदर्भात दिलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता व त्यातील आरोपांची प्रशासकीय पातळीवर चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत, पत्रकारांवरील खोटे व गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली. पत्रकारांनी प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी करत, कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याचे आवाहन केले.
न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
एकदिवसीय आंदोलनानंतरही संबंधित प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्या पत्रकारांनी दिला. “रेती तस्करीविरोधात आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका पत्रकारांनी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व व सहभाग पत्रकार विलास मोहिणकर, शार्दुल पचारे, जितेंद्र गाडगे, शुभम रणदिवे आणि संजय नागदेवते यांनी केले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून आंदोलनाला पाठिंबा
पत्रकारांच्या या आंदोलनाला परिसरातील नागरिकांसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी चिमूर तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष माधव बिरजे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष धनराज भाऊ मुंगले, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम सेलवटकर, अल्पसंख्याक काँग्रेसचे जुनेदभाई खान, बब्बुखान, वंचित बहुजन आघाडीचे नारायण कांबळे, शिंदे सेनेचे तालूका अध्यक्ष विलास भाऊ डांगे, चंदु मडकवार यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांनी पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रेती तस्करीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन रेती तस्करी, व्हायरल ऑडिओ क्लिप आणि पत्रकारांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणात अडकलेले पोलीस आणि महसूल विभाग यांचेवर पुढील काळात कोणती भूमिका घेते, याकडे चिमूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.








