देशाचा राजा बनण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण शिबीर – मनिषभाऊ कावळे
हदगाव दि. (प्रतिनिधी) : प्रशिक्षित कार्यकर्ता शिस्तीत संघटन करु शकतो, त्या शिस्तीतून संघटन मजबूत होते, त्यातून आपली राज्यसत्ता प्रस्थापित होऊ शकते. देशाचा राजा बनण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण शिबीर होय असे विचार बहुजन समाज पक्षाचे राज्य तथा मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे यांनी मांडले.
साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे आणि प्रख्यात गायक वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्ष हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने हदगाव जिल्हा नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून मनिषभाऊ कावळे बोलत होते. जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात मनिषभाऊ कावळे पुढे म्हणाले की, बुड ना शेंडा खांद्यावर झेंडा अशी दलित कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. अशा दिशाभूल झालेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबीरात आणा, त्यांना योग्य विचार देऊन संघटन शक्ती वाढवा, त्यामुळेच देशात व राज्यात आपली सत्ता प्रस्थापित होऊ शकते. देशात मनुवाद आणि आंबेडकरवाद हे दोन वाद आहेत. त्यापैकी आंबेडकरवाद जोपासण्याचे काम बहुजन समाज पक्ष करीत आहे.
*बसपामुळे संविधान सुरक्षित आहे !
१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सत्तेत होते तेव्हा त्यांनी संविधान समीक्षा आयोग नेमला होता त्यास बहुजन समाज पक्षाने तीव्र विरोध केला. आज २८ वर्षानंतर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा संविधान समिक्षा बिल मंजूर करून घेतले. हे रोखण्याची ताकत केवळ बहुजन समाज पक्षात आहे. बहुजन समाज पक्षामुळेच भारतात संविधान सुरक्षित आहे असे विचार बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरातून मांडले.
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरातून महामानव सांगणारी देशातील एकमेव पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे. आज देश संक्रमण अवस्थेतून जात आहे. आपण असेच जर गाफिल राहिलो तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अमूल्य असा मताधिकार २०२९ नंतर काढून घेतला जाईल. जबाबदारीची जाणीव, शिस्त, समर्पण आणि चारित्र्य हे प्रशिक्षण शिबीरातून शिकायला मिळते म्हणून अशा शिबिरांचे गावोगावी आयोजन करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
यावेळी जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के, महिला जिल्हाध्यक्षा मायाताई पाटील, महासचिव जयश्री राऊत, बामसेफचे नागोराव गंगासागर, विधानसभा प्रभारी आर. व्ही. वाठोरे, विधानसभा अध्यक्ष साहेबराव नरवाडे यांनीही आपले विचार मांडले. विधानसभा प्रभारी प्रा. विजय भरणे यांनी सूत्रसंचलन केले तर शेवटी प्रतिभा नरवाडे यांनी आभार मानले.
दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरास बहुजन समाज पक्षाचे नांदेड जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम मामा इंगोले, विधानसभा उपाध्यक्ष गुलाब दवणे, बिव्हीएफ प्रमुख संदीप रायघोळ, सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलतवार, माधव सुर्यवंशी, युवा नेते अमोल खंदारे, प्रतिक्षा वायवळ, अर्चना वाघमारे, रेणुका नरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.








