ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ग्रामसभा बहिष्काराचा निर्णय
शिरवे येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ १८ ऑगस्टपासून आंदोलन; सुरक्षिततेची ठोस उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिनिधी : वैशाली कजबे
अहिल्यानगर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरवे येथे ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी कै. के. पी. एन. पाटील यांचा अमानुष हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक संघ, तांत्रिक संघटना तसेच युनियन डी.एन.ई. १३६ यांच्या वतीने राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, १८ ऑगस्ट २०२६ पासून ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा ग्रामसभेबाबत नोटीस अथवा कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्या ग्रामसभांवर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, यापूर्वीही अनेक ठिकाणी ग्रामसभा प्रसंगी वाद-विवाद, शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की तसेच मारहाणीच्या घटना घडल्याचा दावा संघटनेने केला आहे. काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची वेळही आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी हे शासनाच्या विविध योजना व अभियानांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रशासकीय कामकाज, जनगणना, निवडणूकविषयक कामे, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय विभागांकडून प्राप्त योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
ग्रामसभेच्या अनुषंगाने काही ठिकाणी असामाजिक तत्त्वांकडून ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या अथवा तथ्यहीन तक्रारी करून अनावश्यक प्रशासकीय व सामाजिक दबाव निर्माण केला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. सोशल मीडियावर ग्रामपंचायत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबाबत चुकीचे व्हिडिओ प्रसारित केल्याने संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, आवश्यक प्रशासकीय सूचना तातडीने निर्गमित कराव्यात आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
तसेच ग्रामसभा नियोजित असलेल्या ठिकाणी संबंधित सरपंचांना संघटनेच्या निर्णयाची माहिती देऊन ग्रामसभा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात येणार आहे. सरपंचांनी ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे आयोजन किंवा संचालन करणार नाहीत तसेच ग्रामसभेस उपस्थित राहणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाची नोंद घेऊन संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. शिरवे येथील दुर्दैवी घटनेचा निषेध, ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी हा बहिष्कार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.








