कोवळ्या स्वरांतून देशभक्तीचा हुंकार सहा वर्षीय प्रियांशने भारावून टाकले सायगावकर
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : येवला तालुक्यातील सायगाव येथे देशासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या शौर्याची गाथा आणि मातृभूमीवरील प्रेमाचा संदेश देणारे देशभक्तीपर गीत अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्या प्रियांश संदीप जठार याने आपल्या सुमधुर आवाजात सादर करत सायगावकरांची मने जिंकली.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सायगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रियांशने इस मिट्टी के बेटे जो वापस ना लौटे हे भावस्पर्शी देशभक्तीपर गीत गायले कोवळ्या वयात शहीद जवानांच्या बलिदानाची कथा सांगणारे गीत त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केले त्याच्या प्रत्येक शब्दातून देशप्रेमाची भावना आणि जवानांच्या त्यागाबद्दलचा आदर जाणवत होता.
ज्यांच्या रक्ताने तिरंगा अभिमानाने फडकतो त्या वीर जवानांना सलाम या भावनेने भारलेल्या प्रियांशच्या गायनाने उपस्थित वातावरण देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले गीतातील शहीद जवानांच्या त्यागाचे वर्णन ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानासोबतच भावुकतेची झलकही पाहायला मिळाली.
प्रियांश संदीप जठार हा सध्या शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे अवघ्या सहा वर्षांच्या वयात त्याने देशभक्तीपर गीताचे केलेले सुंदर सादरीकरण ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
वय लहान पण देशप्रेमाची भावना मोठी अशा शब्दांत सायगावकरांनी प्रियांशचे भरभरून कौतुक केले त्याच्या या कलागुणांना आणि देशभक्तीच्या भावनेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
आजच्या पिढीतील मुलांना देशाचा इतिहास स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या जवानांच्या त्यागाची जाणीव करून देणारे प्रियांशचे हे सादरीकरण निश्चितच प्रेरणादायी ठरले.
चिमुकल्या प्रियांशच्या स्वरांतून उमटलेला देशभक्तीचा हा हुंकार सायगावच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची अविस्मरणीय आठवण ठरला.








