व्यसनमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन; पथनाट्यातून सामाजिक बांधिलकीचा जागर
प्रतिनिधी: अंबादास मुकटे माहूर
माहूर : महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत समाज कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट कलापथकाने पथनाट्य व मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, स्वच्छता, देशसेवा आणि सामाजिक बंधुतेचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. संतोष षटकार साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. भारती यांनी उपस्थित मान्यवर तसेच कलापथकातील कलाकारांचा सत्कार केला.
कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा तसेच विविध अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता, शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे, देशसेवा आणि समाजात बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
यावेळी श्री. संतोष वानखडे व श्री. भारती यांनी समयोचित मार्गदर्शनपर भाषणे केली. अध्यक्षीय समारोप करताना गटशिक्षणाधिकारी मा. संतोष षटकार यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या कुटुंबातील व समाजातील प्रिय व्यक्तींना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी व्यापक समाजप्रबोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
विद्यालयात हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निवड केल्याबद्दल प्राचार्य श्री. विश्वास जाधव व उपमुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, समाजकल्याण अधिकारी नांदेड तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती माहूर यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश सातव यांनी केले, तर नारायण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
‘व्यसनमुक्त विद्यार्थी, स्वच्छ परिसर आणि सशक्त समाज’ या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.








