कमठाला गावात जिओ टॉवर असूनही नेटवर्कचा खोळंबा; ग्रामस्थ त्रस्त
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट : तालुक्यातील कमठाला गावालगत जिओ कंपनीचे टॉवर क्रमांक ४७ उभारण्यात आले असले, तरी गावातील नागरिकांना अपेक्षित मोबाईल नेटवर्क सेवा मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. टॉवर उभा असूनही गावातील अनेक भागांत मोबाईलला नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट सेवा ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब बनली आहे. शासकीय कामे, ऑनलाइन व्यवहार, शिक्षण, आरोग्य सेवा, बँकिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नेटवर्कची आवश्यकता असते. मात्र कमठाला गावात पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांची कामे प्रभावित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावालगत जिओचे टॉवर उभारण्यात आलेले असतानाही नेटवर्कची समस्या कायम असल्याने या टॉवरच्या सेवेमध्ये नेमकी कोणती तांत्रिक अडचण आहे, याची संबंधित कंपनी व प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
टॉवरची तांत्रिक तपासणी करून नेटवर्कची समस्या तातडीने दूर करावी आणि गावातील नागरिकांना सुरळीत व दर्जेदार मोबाईल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.








