रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह तरुण ताब्यात
प्रतिनिधी : बशीर तडवी
रावेर, दि. २१ ऑगस्ट २०२६ : रावेर बसस्थानकाच्या मागील बाजूस छोरीया मार्केटजवळ शस्त्र घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणास रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, रावेर बसस्थानकाच्या मागील परिसरात छोरीया मार्केटजवळ एक इसम शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शोध पथकाने परिसरात जाऊन पाहणी केली असता छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राखाडी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेला तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आला.
पोलिस पथकाने त्याला थांबवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लोखंडी धातूचा तपकिरी रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा खोचलेला आढळून आला. तसेच त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव कृष्णा दत्तू पाटील (वय २०), रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर असे सांगितले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९८/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने हे शस्त्र कोठून मिळवले, कोणत्या कारणासाठी खरेदी केले तसेच या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे यांनी केली.








