अर्धापूर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी : मारोती एडकेवार
नांदेड :अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत सध्या सुरू असलेल्या घर क्रमांक बंधनकारक करणे आणि मॅपिंग प्रक्रियेतील ढिसाळ व मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांची मोठी धावपळ होत असून, या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच जिल्हा महासचिव दिपक रुद्राजी मगर यांनी भोकर उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ) लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.
नागरिकांची धावपळ आणि संभ्रमाचे वातावरणनिवेदनात नमूद केल्यानुसार, अर्धापूर नगरपंचायत क्षेत्रात सध्या ‘एस.आर.आय.’ (SRI) प्रक्रियेअंतर्गत घर क्रमांक मॅपिंगचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता, या प्रक्रियेच्या सुरुवातीलाच प्रशासनाने सर्व नागरिकांना नियमांची स्पष्ट कल्पना देणे आणि कागदपत्रे वेळेत जमा करून घेणे आवश्यक होते. मात्र, अंतिम मतदार यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नसताना, नगरपंचायत प्रशासनाने अत्यंत घाईगडबडीने आणि अचानकपणे कागदपत्रे व घर क्रमांकाची माहिती मागवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अर्धापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून त्यांची मोठी धावपळ होत आहे.
कार्यालयात चकरा मारण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाण्याची मागणीमुख्याधिकाऱ्यांच्या या चुकीच्या नियोजनाचा फटका संपूर्ण अर्धापूर शहराला बसत आहे. नागरिकांना कामासाठी नगरपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. हा त्रास वाचवण्यासाठी नगरपंचायतीने स्वतःचे अधिकृत कर्मचारी नियुक्त करून त्यांना थेट नागरिकांच्या घरोघरी पाठवावे आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन कायदेशीर व सोयीच्या पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.तात्काळ आदेश देण्याची विनंती वंचित बहुजन आघाडीचे दिपक रुद्राजी मगर यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्धापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देऊन, घरोघरी कर्मचारी पाठवून ही कामे सुलभ पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत, अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.








