कोपरगावातील अपहरण प्रकरणाचा उलगडा
प्रतिनिधी : रोहित जोशी
कोपरगावातून अपहरण करण्यात आलेल्या १२ वर्षीय मुलीची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत सुखरूप सुटका केली.
या प्रकरणात राहाता येथील एका तरुणासह त्याला मदत करणाऱ्या दरेवाडी येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कोपरगाव येथील निलेश भारत चावरे यांच्या १२ वर्षीय मुलीचे १८ ऑगस्ट रोजी अपहरण झाल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक नियुक्त केले.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अपहृत मुलगी आणि संशयित नूर राजू पठाण (वय १९, रा. आंबेडकरनगर, ता. राहाता) हे अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी येथील हरीमळा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून मुलीची सुखरूप सुटका केली आणि नूर पठाण याला ताब्यात घेतले.
पुढील चौकशीत आरोपी कोपरगावहून मुलीला घेऊन अहिल्यानगरला आल्याचे उघड झाले. तसेच समीर मनोज सोनगत (वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी) याने दोघांना अल्पवयीन मुलीची सुटका, दोघे ताब्यात कोपरगावातून पळून येण्यासाठी मदत केली असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांना आश्रय दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी समीर सोनगत यालाही ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपी आणि अल्पवयीन मुलीला पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली








