जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला किनवटमध्ये केराची टोपली….
“महामार्गांवर अतिक्रमणाचा विळखा कायम, प्रशासन निद्रावस्थेत….!”
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
नांदेड : जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्याचे कडक निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. मिशन मोड वर आणि निश्चित कालमर्यादेत ही धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र, किनवट तालुक्यात या आदेशाचा पार ‘बोजवारा’ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच राहिले असून किनवटमधील परिस्थिती जशाच्या तशीच आहे. राज्य असो वा राष्ट्रीय महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाचा अजस्र विळखा पडला आहे. बेकायदेशीर दुकाने, टपऱ्या आणि पक्की बांधकामे यामुळे महामार्ग अगदी अरुंद झाले आहेत. दररोज वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नगरपरिषद, महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्ट निर्देश असूनही किनवट प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करण्यासाठी मैदानात उतरताना दिसत नाही. कारवाईच्या नावाने केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, स्थानिक अधिकारी डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहेत की काय, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकांचा दाखला देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गांची हद्द निश्चित करण्याचे आणि अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट केले आहे. तरीही किनवटमधील अधिकारी कारवाई करण्यास का कचरत आहेत अतिक्रमणधारकांवर कोणाचा वरदहस्त आहे का, असा खडा सवाल आता उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश केवळ एक ‘कागदी घोडा’ ठरतोय की प्रशासन खरोखरच बुलडोझर चालवून रस्ते मोकळे करणार, याकडे आता संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे.








