हिप्परगा थडी येथे धोकादायक डीपी पोलचा प्रश्न ऐरणीवर; पत्रकारांचा पुढाकार, महावितरणला दिले निवेदन
प्रतिनिधी – एडकेवार मारोती
नांदेड (बिलोली) : २५ ऑगस्ट २०२६, हिप्परगा थडी येथील अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेला डीपी पोल तातडीने दुरुस्त करावा किंवा बदलावा, या मागणीसाठी पत्रकारांनी पुढाकार घेत महावितरण उपविभाग कार्यालय, बिलोली येथे लेखी निवेदन दिले आहे.
बातमी सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी मारोती एडकेवार व दैनिक महाराष्ट्र संकल्पचे जिल्हा प्रतिनिधी राजेश आमेटवार यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, बिलोली यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, हिप्परगा थडी येथील सदर डीपी पोल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो केवळ आतील लोखंडी सळईच्या आधारावर उभा आहे. हा पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
धोक्याची बाब म्हणजे, या डीपी पोलच्या अगदी जवळच महालक्ष्मी मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी क्र. १ व क्र. २, तसेच डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वाचनालय व अभ्यासिका आहे. या ठिकाणी दररोज लहान चिमुकली मुले, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने तातडीने घटनास्थळी पाहणी करून डीपी पोल दुरुस्त करावा किंवा नवीन पोल बसवावा.
सदर डीपी पोल कोसळून कोणतीही जीवितहानी अथवा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महावितरण विभागाची राहील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावर संबंधित उपकार्यकारी अभियंत्यांनी लवकरच पाहणी करून डीपी पोल बदलण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
हिप्परगा थडी येथील डीपीच्या लगतच अंगणवाडी व वाचनालय असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. महावितरणने तातडीने पोल दुरुस्त करावा, अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेस महावितरण जबाबदार राहील – राजेश आमेटवार, मारोती एडकेवार, हिप्परगा थडी








