किनवट तालुक्यात अवैध अन् धोकादायक प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट
“आरटीओ आणि पोलिसांचा वरदहस्त असल्याचा नागरिकांचा आरोप”
प्रतिनिधी- मार्कंडेय सिरमवार
नांदेड़ (किनवट) : दि. २५ ऑगस्ट २०२६, तालुका आणि परिसरातील ग्रामीण भागांत मानवी जीवाशी खेळणारी अवैध व अतिशय धोकादायक प्रवासी वाहतूक सध्या तुफान बोकाळली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, गाडीच्या टपावर सामान आणि प्रवाशांना बसवणे, तसेच वाहनाच्या मागे बंपरवर लटकवून वेगाने गाड्या पळवणे असे भीषण प्रकार दररोज पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे गाडीला नंबर प्लेट ही नाही.
नुकतेच याचे एक ज्वलंत उदाहरण एका घाटरस्त्यावर पाहायला मिळाले. एका चारचाकी वाहनाच्या टपावर अवडंबर सामान लादले असतानाच, मागे बंपरवर दोन प्रवासी आपला जीव मुठीत धरून उभे राहून प्रवास करत होते. नागमोडी आणि धोकादायक वळणावर एखादा जरी चाकाचा झटका बसला किंवा ब्रेक दाबावा लागला, तर हे प्रवासी थेट दरीत किंवा डांबरी रस्त्यावर फेकले जाऊन जागीच प्राणाला मुकण्याची दाट शक्यता आहे.
प्रशासनाचा पाठिंबा की डोळेझाक या बाबद स्थानिक नागरिक व वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात असून, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वरदहस्तामुळेच हे अवैध वाहतूकदार एवढे निर्धास्त झाले आहेत का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्य रस्ते आणि चौकांत पोलिसांची गस्त असतानाही अशा धोकादायक गाड्यांवर कसलीही कारवाई होत नाही. शिवाय या गाड्या बस स्थानाका बाहेरून भरल्या जात आहे. घाट आणि वळणांच्या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त भरलेली वाहने सतत धावत असल्याने मोठ्या अपघातांची टांगती तलवार कायम आहे. ग्रामीण भागात वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने हतबल प्रवाशांना अशा धोकादायक खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे.
आरटीओ व स्थानिक पोलिसांच्या संगनमताने हा अवैध धंदा सुरु असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एखादा मोठा जीवघेणा अपघात घडण्यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी या गाड्यांवर तात्काळ कारवाई करून गाड्या जप्त कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
शासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास नागरिकांच्या जिवाशी होणारा हा खेळ असाच सुरू राहील. आता तरी प्रशासन जागे होऊन कठोर पावले उचलणार की अपघाताची वाट पाहणार असा सवाल जनता विचारू लागली आहे.








