शाहीर राजेंद्र बावनकुळे यांना ‘नागपूर सिटी आयकॉनिक पुरस्कार २०२६’ने सन्मान
कलाकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा; विदर्भभर शाहीर कलाकार मेळाव्यांच्या माध्यमातून कलावंतांना व्यासपीठ
विशेष प्रतिनिधी : प्रदीप कडबे
नागपूर (कामठी) : दि. २६ ऑगस्ट २०२६, येथील शाहीर तथा कलाकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत ‘नागपूर सिटी आयकॉनिक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवारी (२२ ऑगस्ट) नागपूर येथील रविभवनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
एकता फाउंडेशन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय रामटेके, डॉ. मनीषा ठाकरे तसेच भंते यांच्या हस्ते शाहीर राजेंद्र बावनकुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे कामठी परिसरासह संपूर्ण विदर्भातील शाहीर कलाकार आणि कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहीर राजेंद्र बावनकुळे हे गेल्या अनेक वर्षांपासून कलाकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. कलाकारांना शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळावा, कलावंतांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी मोर्चे, उपोषणे, आंदोलने तसेच विविध माध्यमांतून संघर्ष केला आहे.
केवळ स्वतःच्या कलेपुरता मर्यादित न राहता त्यांनी विदर्भातील शाहीर व लोककलावंतांना एकत्र आणण्याचे काम हाती घेतले आहे. विदर्भाच्या विविध भागांत शाहीर कलाकार मेळाव्यांचे आयोजन करून नवोदित तसेच अनुभवी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे.
लोककला, शाहिरी परंपरा आणि पारंपरिक कलाप्रकार काळाच्या ओघात लुप्त होऊ नयेत, नव्या पिढीपर्यंत त्यांची परंपरा पोहोचावी, यासाठीही बावनकुळे यांची धडपड सुरू आहे. कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजात लोककलेचे महत्त्व कायम राहावे, यासाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत.
कलाकारांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यापासून ते कलावंतांना संघटित करण्यापर्यंत केलेल्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना ‘नागपूर सिटी आयकॉनिक पुरस्कार २०२६’ने गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेचा आणि कलाकारांसाठी केलेल्या संघर्षाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहीर कलाकार, लोककलावंत, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध स्तरातील नागरिकांकडून शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे कलाकारांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या चळवळीला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.








