चामोर्शी माता – बाळ मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघर
गडचिरोली :दि. २६ ऑगस्ट २०२६, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथीत हलगर्जीपणा मुळे २७ वर्षीय महिला व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांणी चौकशी समिती स्थापन केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी .अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी आणि आणि आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती .त्यानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांनी दि. २४ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्य समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी निवासी वैद्यकीय अधिकारी( बाह्य संपर्क ) जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली चे डॉक्टर अमरेश तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. समितीमध्ये वैयक्तिक अधीक्षक डॉ. प्रसाद बनसोड, स्त्रीरोग व प्रस्तुतीशास्त्र तज्ञ डॉ. इंद्रजीत नागदेवते, शारीरिक तज्ञ डॉ. मुकुंद ढाले, भूलतज्ञ डॉ. समीर बनसोड आणि सहाय्यक प्राध्यापक न्यायवैद्यक डॉ. शुभम मुंडे यांचा समावेश आहे. समितीने प्रकरणाची तात्काळ चौकशी करून चौकशी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चौकशीचे ठिकाण एसटीटी हाॅल जिल्हा रुग्णालय गडचिरोली असून दि. २५ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्याचे आदेश नमुदात आहे.
दि. २३ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता जिजा हंसराज सातार वय वर्ष २७ रा.चामोर्शी यांना प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने व योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रस्तुती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला. तर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर महिलेला गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात रेपर करण्यात आले मात्र उपचारादरम्यान महिलेचा सुध्दा मृत्यू झाला.
चौकशी समिती स्थापन झाल्याने प्रशासनाने प्रकरणाची दाखल घेतली असली तरी ,चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होऊन दोष निश्चित झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे .अशी मागणी अमिता मडावी आणि राज बनसोड यांनी केली आहे.
माता आणि नवजात बळाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, उपचारात कोणतीही वैदकीय किंवा प्रशासकीय त्रुटी झाली का, तसेच रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळाले का ,याचा तपास समितीचे अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या निष्कर्षाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सदरील घटनेनंतर अमिता मडावी व राज बनसोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते .उपचारात हलगर्जपणा झाला आहे का, रुग्णाला वेळेत आवश्यक उपचार मिळाले का, रेपर करण्यात विलंब झाला का, आणि या घटनेला कोण जबाबदार आहे .निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.








