मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विदर्भव्यापी संमेलनात एल्गार; “आगामी निवडणुकांत लाल झेंडा फडकविणार!”
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
वर्धा, दि. २५ ऑगस्ट २०२६ : हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विदर्भव्यापी संमेलन आज वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
संमेलनाला कॉ. अशोक ढवळे, कॉ. मय्सिम ढवळे, कॉ. डी. डी. कराड, कॉ. आडम मास्तर, कॉ. गावित, कॉ. अजित नवले, कॉ. विनोद निकोले, कॉ. लाटकर, कॉ. अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष, सामान्य जनतेला राजकीय प्रतिनिधित्व आणि भांडवलदारांच्या हिताची व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरणार आहे, असा निर्धार संमेलनातून व्यक्त करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्ष पूर्ण ताकदीने लढून कार्यकर्त्यांच्या बळावर लाल झेंडा फडकविण्याचा एकमुखी संकल्प यावेळी करण्यात आला.
देशातील आणि राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी राजकारणाचे अधःपतन केले असून, जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण स्वच्छ करण्याची जबाबदारी डाव्या पक्षांची आहे, असे प्रतिपादन कॉ. अशोक ढवळे यांनी केले.
दरम्यान, प्रमुख नेत्यांचे संमेलनस्थळी आगमन होताच कार्यकर्त्यांनी “लाल सलाम!” च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी डाव्या चळवळीने रणशिंग फुंकल्याचे चित्र वर्ध्यात पाहायला मिळाले.








