मातृतीर्थ येथे परिक्रमा यात्रेनिमित्त अन्नदानाची जय्यत तयारी
प्रतिनिधी : अंबादास मुकटे
माहूर : विश्वस्त समिती, श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मातृतीर्थ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्रमा यात्रेनिमित्त भाविकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यात्रेदरम्यान दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना भोजनाची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत आहे.
अन्नदानाच्या व्यवस्थेच्या नियोजनासाठी अरुण घोडेकर, आकाश वानखेडे, श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, विश्वस्त संजय कानव, चंद्रकांत भोपी, दुर्गादास भोपी यांच्यासह संस्थानचे कर्मचारी व सेवेकरी तयारीला लागले आहेत.
परिक्रमा यात्रेत दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. धार्मिक श्रद्धेने मातृतीर्थाची परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान हा महत्त्वपूर्ण धार्मिक व सामाजिक उपक्रम मानला जातो. यात्रेदरम्यान भाविकांना शिस्तबद्ध व सुरळीत पद्धतीने भोजन मिळावे, यासाठी भोजन व्यवस्था, सेवेकरी व स्वयंसेवकांचे नियोजन करण्यात येत आहे.
यासोबतच मातृतीर्थ परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था तसेच भाविकांच्या इतर आवश्यक सोयी-सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. भाविकांना सुरक्षित व सुखकर वातावरण मिळावे, यासाठी संस्थान प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
अन्नदानाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याचा हा धार्मिक उपक्रम भक्तिभावाने राबविण्यात येणार आहे. परिक्रमा यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा तसेच संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.








