‘तार’ चोरांचा मास्टरप्लॅन फसला! भिसी पोलिसांच्या जाळ्यात तिघे; ७.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर : तालुक्यातील भिसी परिसरात एम.एस.ई.डी. च्या टिटवी शेतशिवारातील कृषी पंपांना जोडणारी ॲल्युमिनियम तार चोरणाऱ्या चोरट्यांना भिसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कनिष्ठ अभियंता कृपाल महादेव लांजे वय ४०, रा. भिसी यांनी १२ ते १८ ऑगस्ट २०२६ दरम्यान मौजा टिटवी शेतशिवारातील २१ स्पॅन ईलेक्ट्रिक सप्लायच्या १,५१,००० रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारा चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता, मनिष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे (वय २९) व फरार आरोपी सोमेश्वर चौधरी (दोन्ही रा. पारडपार, ता. चिमूर) यांनी ही तार चोरून जांभुळघाट येथील भंगार दुकानदार स्वप्निल सुनिल हजारे (वय २०) व कुणाल गणेश हजारे (वय १९) यांना विकल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी स्वप्निल हजारे, कुणाल हजारे व मनिष वाकडे या तिघांना अटक केली. त्यांना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. जप्त केलेला मुद्देमाल:
ॲल्युमिनियम तार (२१ स्पॅन): ₹१,५१,०००, पिकअप वाहन: ₹५,००,०००, स्प्लेंडर दुचाकी वाहन एम.एस. ₹५०,०००, एकूण मुद्देमाल: ₹७,०१,०००, गुन्ह्यातील फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी रा. पारडपार याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल काचोरे, सपोनि सर्वेश बेलसरे, सपोनि मंगेश भोंगाडे, पोहवा नितिन कुरेकार, पोहवा प्रमोद कोटनाके, पोअं अमोल सावे, चापोअं गजानन मडावी, स.फौ. बाळकृष्ण जिभकाटे, पोहवा सुनिल घोडमारे, पोअं सतिश झिलपे व पोअं मंगेश चौधरी, पोअं वैभव गोहणे यांनी पार पाडली.
या कारवाईमुळे तार चोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे .








