शंकरपूरला नियमित एमबीबीएस डॉक्टर द्या; अन्यथा ५ ऑक्टोबरला आंदोलन
२८ गावांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर; उपसरपंच अशोक चौधरी यांचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी जोर धरत असून, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास ५ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय शांततामय उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिला आहे. शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे शंकरपूरसह परिसरातील तब्बल २८ गावांतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. ३० एप्रिल २०२६ पूर्वी या केंद्रात दोन एमबीबीएस डॉक्टर कार्यरत होते. मात्र सध्या केंद्रात एकही नियमित एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना वेळेवर आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अपघात, सर्पदंश, गंभीर आजार, गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षित डॉक्टरांची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. मात्र नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी चिमूर किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे.
सध्या शंकरपूर व परिसरात ताप, मलेरिया, कावीळ, सर्दी, खोकला आदी आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित एमबीबीएस डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः शेतीच्या हंगामात उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वी दोन डॉक्टर कार्यरत असले तरी सध्याची प्रमुख मागणी किमान एक नियमित एमबीबीएस डॉक्टर तात्काळ नियुक्त करण्याची आहे. तसेच केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. अपघात, सर्पदंश, प्रसूती, गंभीर आजार आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
आहे. शंकरपूर व परिसरातील नागरिकांना नियमित, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात यावी, तसेच केंद्रातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास ५ ऑक्टोबर २०२६ रोजी एकदिवसीय शांततामय उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण प्रशासनाने निश्चित केलेल्या अथवा कायद्यानुसार परवानगी असलेल्या ठिकाणी करण्यात येईल. आंदोलनादरम्यान रुग्णसेवा, रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियमित कामकाजात कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शंकरपूरला डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक सरकारकडे डॉक्टरांसाठी भीक मागो आंदोलनही करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा उद्देश प्रशासनाचा अवमान करणे नसून ग्रामीण जनतेला मूलभूत आरोग्यसेवेसाठीही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे अशोक चौधरी यांनी म्हटले आहे.
या प्रतीकात्मक आंदोलनातून जमा होणारी रक्कम वैयक्तिक वापरासाठी न ठेवता संबंधित प्रशासनाच्या सूचनेनुसार शासनाकडे सुपूर्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलन करताना प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सर्व सूचना, आवश्यक परवानग्या तसेच लागू कायदेशीर नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात उपसरपंच अशोक चौधरी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक नियमित एमबीबीएस डॉक्टर तात्काळ नियुक्त करून ग्रामीण आरोग्यसेवा सक्षम करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर तातडीने कार्यवाही न झाल्यास नियोजित आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.








