*भाकपाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे गांगलवाडी स्टेट बँकेला घेराव;*
*पीक कर्जासाठी ना-देय प्रमाणपत्र देण्याची व लॉक केलेली बँक खाती सुरू करण्याची जोरदार मागणी!*
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
चंद्रपूर (ब्रह्मपुरी) : सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना भारतीय स्टेट बँक शाखा गांगलवाडी (ता. ब्रह्मपुरी) प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पीक कर्जासाठी आवश्यक असलेले ना-देय प्रमाणपत्र (No-Dues Certificate) तातडीने देण्यात यावे आणि थकीत कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांची बेकायदेशीरपणे लॉक केलेली बँक खाती पूर्ववत सुरू करण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी 28 ऑगस्ट 2026 रोजी गांगलवाडी स्टेट बँकेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाकप चंद्रपूर जिल्हा सहसचिव कॉ. विनोद झोडगे यांनी केले. यावेळी मा.निरंजन रंगारी बँक शाखा व्यवस्थापकांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
*आंदोलनातील प्रमुख मागण्या व मुद्दे:*
ना-देय प्रमाणपत्र त्वरित द्या: खरीप शेतीचा हंगाम सुरू असून दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व इतर शेतीकामांसाठी पीक कर्जाची नितांत गरज आहे. मात्र, गांगलवाडी शाखा नियमानुसार शेतकऱ्यांना ना-देय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत.
बेकायदेशीर लॉक केलेली खाती तात्काळ सुरू करा:
थकीत कर्जाचे कारण पुढे करून बँकेने अनेक शेतकऱ्यांची सुरू असलेली बँक खाती मनमानी पद्धतीने लॉक केलेली आहेत, ती तातडीने अनलॉक करण्यात यावीत.
*योजनांच्या अनुदानातील कपात थांबवा:* शासनाच्या विविध कृषी व कल्याणकारी योजनांअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे शासकीय अनुदान आणि इतर हक्काचे पैसे बँक नियमबाह्य परस्पर कपात करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून ही कपात त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांवर बँकेने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा कॉ. विनोद झोडगे यांनी बँक प्रशासनाला दिला. या निवेदनाची प्रत ब्रह्मपुरी तहसीलदार यांनाही पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे. या घेराव आंदोलनात बरडकिन्ही येथील उपसरपंच भास्कर गोटेफोडे,सुनील शेंडे,माजी उपसरपंच विनोद पाटील, गोलू दरवे, डेबूजी भोयर, गोवर्धन शेंडे,हरिदास मेश्राम,महादेव प्रधान,पंढरी दोनाडकर,मधुकर शेंडे,योगेश मलोडे,दीपक देशमुख यासह परिसरातील शेतकरी व भाकप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– कॉम्रेड विनोद झोडगे पाटील जिल्हा सहसचिव भाकपा ब्रह्मपुरी.








