दौंडमध्ये ५० हजार ६०२ रुपयांचा विमल पान मसाला व गुटखा जप्त
आरोपीला अटक; दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड शहरातील सरपंचवस्ती परिसरातील ओमसिद्धी सुरज अपार्टमेंट, डी विंग, फ्लॅट क्रमांक १४ येथे छापा टाकून दौंड पोलिसांनी ५० हजार ६०२ रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. ही कारवाई २८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल हरिश्चंद्र जावळे, यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड उपविभाग येथे प्रतिनियुक्तीवर आहेत, यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शोएब लाडलेमशाक मुल्ला (वय २४, व्यवसाय शिक्षण, रा. डी-१४, ओमसिद्धी सुरज अपार्टमेंट, समतानगर, सरपंचवस्ती, गोपाळवाडी रोड, दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड येथे फिर्यादी पोलीस हवालदार विशाल जावळे, पोलीस हवालदार शेडगे व पोलीस हवालदार सोनल शिंदे उपस्थित असताना, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
सरपंचवस्ती येथील ओमसिद्धी सुरज अपार्टमेंटच्या डी विंगमधील फ्लॅट क्रमांक १४ मध्ये प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान पोलिसांना विविध प्रकारचा विमल पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ५० हजार ६०२ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४३ हजार ५६० रुपये किमतीचा विमल पान मसाला, ५ हजार ९४० रुपये किमतीचा विमल पान मसाला, ५२५ रुपये किमतीचा विमल पान मसाला, २२५ रुपये किमतीचा बी-१ तंबाखू, १७६ रुपये किमतीचा विमल पान मसाला, ४४ रुपये किमतीचा व्ही-१ तंबाखू आणि १३२ रुपये किमतीचा व्ही-१ तंबाखू यांचा समावेश आहे.
सदर मुद्देमाल दोन पंचांसमक्ष पोलिसांनी पंचनामा करून कागदी सील व लेबले लावून जागीच जप्त केला.
आरोपीला अटक
या प्रकरणी आरोपी शोएब लाडलेमशाक मुल्ला याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व नियमावली २०११ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला २८ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक ई. बिद्री करीत आहेत.








