निपाणी सावरगाव स्मशानभूमी प्रश्नावर प्रशासनाची सकारात्मक भूमिका: जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
गावकऱ्यांची दीर्घकालीन समस्या सुटण्याच्या मार्गावर; प्रशासनाकडून कायदेशीर कार्यवाही पूर्ण
प्रतिनिधी : धनाजी जोशी
मौजे निपाणी सावरगाव (ता. देगलूर) येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक व ठोस पाऊल उचलले असून, खाजगी जमीन भूसंपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
गावात सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी आंदोलनकर्ते आकाश कोकणे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून आंदोलन छेडले होते. त्यावेळी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न नियमानुसार प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत प्रशासकीय पातळीवर सर्व तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आल्या आहेत.
गावात शासकीय किंवा गायरान जागा उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, स्मशानभूमीसाठी खाजगी जमीन संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मौजे निपाणी सावरगाव येथील गट क्र. १ मधील ०.६७ आर पैकी ०.२० आर जमीन सार्वजनिक स्मशानभूमीसाठी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित जमीन मालक श्री. रामराव गोविंद कोकणे यांनी शासनाच्या नियमानुसार योग्य मोबदला मिळण्याच्या अटीवर ही जमीन देण्यास लेखी संमती (१०० रु. बाँडवर) दिली आहे.
ग्रामपंचायतीचा ठराव, ७/१२ उतारा, संमतीपत्र, नमुना ‘क’, परिशिष्ट १ ते ८, गायरान जागा उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र व ट्रेस नकाशा या सर्व कागदपत्रांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन स्मशानभूमीचे काम मार्गी लागेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट व चर्चा: मौजे नि. सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. आकाश दत्ता पाटील कोकणे यांनी या विषयावर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने स्वतः गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी उपोषणस्थळी वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून स्मशानभूमी संदर्भात शासन व प्रशासन पातळीवर सुरू असलेल्या प्रगतीपथावरील प्रयत्नांची व वस्तुस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशासनाकडून सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबींची पूर्तता अत्यंत गतीने केली जात असल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता उपोषणापासून परावृत्त व्हावे, तसेच सुरू असलेल्या शासकीय प्रक्रियेस सहकार्य करावे, अशी अधिकृत विनंती प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
मौ. निपाणी सावरगाव येथे उपोषण कर्ते श्री आकाश पाटील कोकणे यांना उपोषण पासून परवृत्त करण्यासाठी प्रशासनाची भेट देण्यात आली.
यावेळी तहसीलदार भरत सुर्यवंशी मा. BDO सर, मा. ना.त. रायेवार सर, PSI , मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रा.म. अधिकारी, ग्रा. वि. अधिकारी उपस्थित होते.








