शेकापूर येथील ग्रामसभेतील धक्कादायक प्रकार, माहूर पोलिसांत गुन्हा दाखल, विविध कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई
प्रतिनिधी: अंबादास मुकटे
शेकापूर ता. माहूर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायतच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महेश अशोकराव कांबळे यांनी माहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चौघांसह इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेकापूर ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महेश कांबळे यांच्यासह त्यांचे भाऊ समाधान अशोकराव कांबळे हे पत्रकार म्हणून ग्रामसभेला उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या कामकाजातील विविध हिशोब ग्रामसभेसमोर सादर करण्याची मागणी समाधान कांबळे यांनी केली. यावरून वाद निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रश्न विचारल्याच्या रागातून चिथावणी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, याच कारणावरून सुनील नामदेवराव बेहरे यांनी समाधान कांबळे यांच्याविरुद्ध इतरांना चिथावणी दिली. त्यानंतर गणेश नामदेव राठोड व विवेक गणेश राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करत समाधान कांबळे यांच्यावर हल्ला केला. महेश कांबळे यांनी भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पकडून ठेवण्यात आले आणि विवेक राठोड याने लोखंडी रॉडने समाधान कांबळे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हल्ल्यावेळी रामेश्वर चव्हाण यांच्यासह अन्य काही जणांनी हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेत समाधान कांबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
*माहूर पोलिसांत गुन्हा दाखल*
या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात FIR क्रमांक 0160/2026 नोंद करण्यात आला आहे. तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 109(1), 115(2), 352, 351(1), 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.








