वीर एकलव्य यांचे स्मारक पासर्डी येथील नियोजित जागेत उभारण्यात यावे
जळगाव : आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या वीर एकलव्य यांचे स्मारक पासर्डी येथील नियोजित जागेत उभारण्यात यावे या मागणीसाठी भारत सोनवणे व इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देत २० बाय २० फूट इतकी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या मागणीकडे सरपंच व ग्रामसेवकांकडून वारंवार दुर्लक्ष व टाळाटाळ होत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासकीय सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायतीत नियमित येत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच महिला सरपंच असतानाही ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पती हाकत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायतला कुलूपच असल्याचं बोललं जात आहे.
यासोबतच आदिवासी गल्लीतील गटारी व इतर विकासकामे रखडल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. मागणी करूनही केवळ आश्वासन मिळत असून प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आदिवासी महिला व समाजबांधवांनी एकत्र येत वीर एकलव्य स्मारकाच्या मागणीसाठी आवाज बुलंद केला व ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला, त्यामुळे आता ग्रामपंचायत या मागणीवर काय निर्णय घेते, स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते का आणि आदिवासी ग्रामस्थांच्या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे पासर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे








