रायपूर उर्दू शाळेतील ७ शिक्षक पदे भरा; अन्यथा विद्यार्थ्यांसह बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
रायपूर : रायपूर येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत ५०६ विद्यार्थी शिक्षण घेत असताना मंजूर १६ शिक्षक पदांपैकी केवळ ९ शिक्षक कार्यरत असून तब्बल ७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, ही रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज, शेख राजू शेख बुढन व मोहम्मद साबीर मो. उस्मान यांनी केली आहे.
शाळेतील रिक्त पदांमध्ये सामाजिक शास्त्राचे १, भाषा विषयाचे १, सहाय्यक अध्यापकांची ४ आणि मुख्याध्यापकाचे १ पद अशा एकूण ७ पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापकाचे पद जवळपास तीन वर्षांपासून रिक्त असून, अद्यापही त्यावर नियुक्ती झालेली नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याने रायपूर जि. प. उर्दू शाळेतील सर्व ७ रिक्त पदे या प्रक्रियेतून तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी गरीब, शेतकरी, शेतमजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असल्याने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
या प्रश्नाबाबत रायपूर ग्रामस्थांनी २२ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र अद्याप रिक्त पदे भरण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१५ दिवसांचा अंतिम अल्टिमेटम प्रशासनाने पुढील १५ दिवसांत रायपूर जि. प. उर्दू प्राथमिक शाळेतील सर्व ७ रिक्त शिक्षक पदे भरण्याची कार्यवाही करावी, तसेच जवळपास तीन वर्षांपासून रिक्त असलेले मुख्याध्यापक पद तातडीने भरावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयासमोर लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. आवश्यकतेनुसार हे आंदोलन बेमुदत करण्यात येईल, असा इशारा मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज, शेख राजू शेख बुढन व मोहम्मद साबीर मो. उस्मान यांनी दिला आहे.
“हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून रायपूरच्या ५०६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आहे. मंजूर शिक्षक पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड सहन केली जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
मुख्य मागण्या : मंजूर १६ शिक्षक पदांपैकी रिक्त असलेली ७ पदे तातडीने भरणे, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेत या पदांचा समावेश करणे, जवळपास तीन वर्षांपासून रिक्त असलेले मुख्याध्यापक पद भरणे आणि ५०६ विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणे.








